
पुणे (Pune) : केंद्र सरकारच्या अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून शहरातील रस्ते स्मार्ट केले जात आहेत. त्यात मुख्य मार्गिकेसह सायकल ट्रॅक व पदपथांचाही समावेश आहे. त्यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात रस्त्यांचा सर्वाधिक ४६ टक्के वापर दुचाकीस्वार आणि त्याखालोखाल २३ टक्के वापर पादचारी करीत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय, पदपथांअभावी सर्वाधिक अपघात झाले असल्याचेही निदर्शनास आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेत संपूर्ण पिंपळे सौदागरसह पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपळे निलख व वाकडच्या काही भागांचा समावेश आहे. या भागातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित शहरात अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यात पदपथांची निर्मितीवर अधिक भर आहे. काही रस्त्यांवर सायकल ट्रॅकही उभारले जात आहेत.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे व खासगी वाहनांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासंदर्भात खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार रस्त्यांचे डिझाईन करून निर्मिती केली जात आहे. पदपथांअभावी नागरिक रस्त्यांवरून चालतात, त्यामुळे अपघात होतात. पादचाऱ्यांसाठी प्रशस्त पदपथ, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका, पार्किंग व्यवस्था अशा उपाययोजना केल्या जात आहेत.
अशी आहेत निरीक्षणे
(उदाहरणार्थ ६० मीटर रुंद रस्ता)
१) सलग ६० मीटर रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ व मध्यभागी दुभाजक असतो. त्याच्या दोन्ही बाजूस मुख्य मार्गिका असल्यास खासगी दुचाकी व चारचाकी वाहने धावतात. साधारण दोन हजार ३०० मोटारी धावल्यास तीन हजार ५०० लोक प्रवास करतात.
२) साठ मीटर रस्त्याच्या दुभाजकाला अनुसरून रस्त्याच्या लांबीइतका उड्डाणपूल उभारला जातो. तो दुहेरी असतो. खाली दोन्ही बाजूस मुख्य मार्ग व पदपथ असतात. त्यामुळे खालील रस्त्यावरील ताण कमी होऊन काही दुचाकी व चारचाकी वाहने पुलावरून जातात. रस्ता व पूल मिळून तीन हजार ६०० मोटारीतून पाच हजार चारशे लोक प्रवास करतात.
३) रस्त्याच्या दुभाजकाच्या दोन्ही बाजूने बीआरटी बस मार्ग उभारून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होऊ शकते. बीआरटीलगत मुख्य मार्ग, त्यालगत पदपथ उभारल्यास सार्वजनिक वाहनांचा वापर वाढू शकतो. खासगी मोटारींची संख्या घटू शकते. त्यामुळे खासगी मोटारींची संख्या दोन हजार शंभर येऊन साठ बस धावतील. त्यामुळे आठ ते १२ हजार लोक प्रवास करतील.
असा होतोय रस्त्यांचा वापर
वाहने / टक्के
दुचाकी / ४६
पादचारी / २३
कार, टॅक्सी / १५
ट्रक, बस / ११
रिक्षा / ३
सायकल / २
रस्त्यांवरून सुरक्षित प्रवास व्हावा, याला प्राधान्य देऊन शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यांचे डिझाईन अभियंत्यांनी केले आहे. पादचाऱ्यांसाठी पदपथ आणि सायकलस्वारांसाठी सायकल ट्रॅक उभारण्यात येत आहेत. पदपथ नसल्याने पादचारी रस्त्यांवरून चालत होते, त्यांची पदपथांमुळे सोय होणार आहे. सुरक्षित प्रवास हाच यामागील उद्देश आहे.
- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका