पुणे (Pune) : मुंबई- बंगळूर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिर ते वडगाव पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यावर पावसामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे चित्र आहे. मात्र या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिक म्हणत आहेत.
दुचाकी या खड्ड्यांत आदळत असून किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच कार, मोठी जड वाहने यांनाही या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची काही ठिकाणी डागडुजी केली, तात्पुरती मलमपट्टी झाली, मात्र ती देखील व्यवस्थित झालेली नाही. निकृष्टपणे या सेवा रस्त्यांची दुरुस्ती केली जात आहे. परिणामी येथे जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर असणारे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत. याबाबत रिलायन्स टोल प्लाझा कंपनीचे अधिकारी राकेश कोळी म्हणाले, ‘‘आम्ही स्वामी नारायण मंदिर ते वडगाव पुलादरम्यान असणारे खड्डे दोन दिवसांत बुजविणार आहोत.’’ तसेच राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला परंतु त्यांचा फोन बंद असल्याने खड्डे बुजविण्याबाबत माहिती मिळाली नाही.
सेवामार्गावरून महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे गेल्या महिन्यापासून ‘जैसे थे’ आहेत. दिवसभर या रस्त्यावर मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावर अंधार आणि खड्डे, तसेच पावसाचे पाणी असल्यामुळे रस्त्याचा काहीही अंदाज येत नाही. त्यामुळे जीव गेल्यावर प्रशासन खड्डे भरणार आहे, असे वाटते.
- संजय सोळंकी, स्थानिक नागरिक
सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सेवा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना मोठे अडथळे येत आहेत. खराब झालेला हा सेवा रस्ता त्वरित दुरुस्त करावा.
- मिठू आरेकर, स्थानिक नागरिक