मुंबई (Mumbai) : मुंबई पूर्व उपनगरातील एम पश्चिम विभागातील रस्त्यांच्या कामांसाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्र टेंडर काढले आहे. या १३ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटच्या कामांसाठी ८९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 'एम बी इन्फ्रोप्रोजेक्ट्स' या कंपनीने उणे २५ टक्के दराने बोली लावत हे टेंडर मिळवले आहे.
मुंबईतील सर्वच रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवून खड्डा मुक्त रस्ते बनवण्याचा निर्धार करत पहिल्या टप्प्यात ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकासाची कामे सुरु असतानाच दुसऱ्या टप्प्यातील पश्चिम उपनगरातील तीन परिमंडळ आणि पूर्व उपनगरातील दोन परिमंडळांमधील रस्ते कामांसाठी कंत्राटदार निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील दुसऱ्या टप्प्यातील रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांसाठी एकच स्वतंत्र टेंडर काढून विविध करांसह सुमारे १६७६ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे. तब्बल २६१ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटच्या कामांसाठी 'गावर कंस्ट्रक्शन लिमिटेड' कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र, पूर्व उपनगरातील या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांमध्ये एम पश्चिम विभागांतील केवळ सहा रस्त्यांचाच समावेश आहे. त्यामुळे आता या भागातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमला आहे. या १३ रस्त्यांच्या कामांसाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये टेंडर मागवण्यात आले होते आणि यामध्ये 'एम बी इन्फ्रोप्रोजेक्ट्स' या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीने उणे २५ टक्के दराने बोली लावत हे काम ६४ कोटी ४७ लाखांमध्ये मिळवले असून विविध करांसह याची किंमत सुमारे ८९ कोटी रुपये एवढी झाली आहे. या कामांसाठी 'माहिमतुरा कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली असून या सल्लागाराला १ कोटी ३४ लाख रुपये दिले जाणार आहेत.
पूर्व उपनगरातील एम पश्चिम विभागातील श्रीनगर को हौ सोसायटीपासून पूर्व द्रुतगती महामार्ग सेवा रस्ता, मुकुंद नगरमधील शंकरालयम मंदिरा समोरील रस्ता, नागेवाडी रस्ता, सहकार नगर रस्ता क्रमांक ३, के ए गायकवाडी रस्ता, चौथा क्रॉस रोड, मीना टॉवरच्या जवळील संत ककैया मार्गाच्या बाजुच्या पट्टा, वैभव नगरच्या आतील रस्त्यापासून द्रुतगती फ्री वे पुलाला जोडणारा रस्ता, कर्नाटक हायस्कूलपासून साई निधी सोसायटीपर्यंतचा रस्ता, उत्तम सोसायटीपासून कर्नाटका हायस्कूलपर्यँतचा सुरेश पेडणेकर मार्ग, डॉ सी जी रस्त्यापासून एम एस बिल्डींग नंबर २७ पर्यंतचा रस्ता, माहुला व्हिलेज रस्त्याच्या चौकापासून फायर स्टेशन बिल्डींग पर्यंतचा डी बी रियालिटी आतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार आहे.