
मुंबई (Mumbai) : अंधेरीतील सी.डी. बर्फीवाला रोड ते जूहू-वर्सोवा रोड दरम्यान मेट्रो 2 मार्गिकेच्याखाली नवीन उड्डणपूल बांधण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या विचारात आहे. १.६५ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यासाठी ४३६ कोटींचा खर्च येईल असा अंदाज आहे. सध्या या उड्डाणपुलाची व्यवहार्यता तपासण्यासाठी आयआयटी मुंबईची नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने 2016 मध्ये उड्डाणपुलाचे नियोजन सुरु केले होते. त्यानंतर दोन सल्लागांराची नियुक्तीदेखील केली होती. मेट्रो स्टेशन मुळे या उड्डाणपुलाचा मार्ग बदलण्यात आला होता. हा नवीन मार्ग भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनीवरून जातो. जमिनीसाठी विमानतळ प्राधिकरणाला 11.16 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला जानेवारी 2023 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. या कालावधीत महापालिकेने 436 कोटी रुपये खर्चून 1.65 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचाही प्रस्ताव दिला होता. गेल्या तीन वर्षांत विमानतळ प्राधिकरणाने आपल्या अखत्यारित येणाऱ्या जागेमध्ये उंचीला मर्यादा असून या ठिकाणची उंची मर्यादा शून्य मीटर इतकी आहे, असे १६ मे २०२३ रोजी दिलेल्या अभिप्राय म्हटले आहे. उड्डाणपुलाची प्रस्तावित जागा ही विमानतळ प्राधिकरणाची आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पर्याय शोधण्याची विनंती विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेला केली होती. त्यामुळे महापालिकेने मुंबई मेट्रो 2 बी मार्गिके खाली हा उड्डाणपूल प्रस्तावित केला आहे.
नवीन उड्डाणपुल 1.65 किलोमीटरचा असेल. जो जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट (JVPD) स्कीम सर्कल म्हणजेच जुहू सर्कल ते सीडी बर्फीवाला रोडवरील मेयर हॉलला जोडेल. या उड्डाणपुलामुळे जुहू ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंतचे अंतर फक्त 10 मिनिटांत कापता येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो. हा उड्डाणपूल चार लेनचा असेल, प्रत्येक बाजूला दोन लेन असतील. यामुळे नेहमी गजबजणाऱ्या जुहू सर्कलवरील वाहतूककोंडी कमी होईल. अंधेरी पश्चिम येथील जुहू-वर्सोवा रोड, जुहू जंक्शन परिसरात होणाऱ्या वाहतुककोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 10 ते 15 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. यामुळे नागरिकांचा वेळ तर वाया जातोच त्याचबरोबर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागतो.