
मुंबई (Mumbai) : ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यासाठी टेंडर जाहीर न करता त त्याच कंत्राटदारांवर आनंदाचा वर्षाव का केला जात आहे. तीन दिवसांमध्ये कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता थेट काम देऊन कुणाची दिवाळी-दसरा साजरा केला जातोय, असे सवाल उपस्थित करत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सणासुदीच्या काळात राज्यातील गोरगरीब जनतेला, जाहिरातबाजीच्या माध्यमातून ‘आनंदाचा शिधा’ शंभर रुपयात मिळेल, अशा वल्गना करून गरिबांच्या आनंदाच्या नावावर कुणाची घबाड भरण्याचे काम सरकार करतेय, याच स्पष्टीकरण राज्यातील १५ कोटी जनतेला सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी केली. गरिबांचा गौरी-गणपती सण खरेच सरकारला गोड व्हावा असे वाटत असेल, तर यात चाललेला सावळा गोंधळ थांबवावा आणि पारदर्शक प्रक्रियेतून याचे टेंडर ई-पोर्टल द्वारे पार पाडावे, अशीही मागणी त्यांनी केली.
किटसाठी अधिक पैसे का?
सरकारने आनंदाच्या शिधासाठी प्रत्येकी २३९ रुपये किमतीने किट घेतले आहे. पण बाजारातील चना डाळ, रवा, साखर आणि पाम तेलाचे भाव पाहता हे सगळे फक्त १७६ रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळायला हवे. मग, हे अधिकचे पैसे कंत्राटदार आणि सरकारमधील काही लोकांच्या खिशात घालण्याचा हा कट आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे थेट लाभ दिला जावा अशीही मागणी त्यांनी केली.