
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्ह्यात एका ठिकाणी 3 वर्षांत 5 पेक्षा अधिक गंभीर अपघात झालेले ६० ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यातील निम्मे ब्लॅक स्पाॅट हे छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत आहेत. शहर वाहतूक शाखेने या ठिकाणांची यादी करणे अपेक्षित असून, त्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करुन तात्काळ करता येण्यासारख्या उपाययाेजना सुचविणे अपेक्षित आहे. जेणेकरुन येत्या काळात प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करता येईल.
जिल्ह्यातील बेलगाम वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने रस्ते सुरक्षा समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. मात्र समितीच्या कामकाजाची माहिती घेता कधीही आढावा घेतला जात नाही. दोन दिवसांपुर्वी चिकलठाणा हद्दीत जालनारोडवर दुचाकी व जड वाहनाच्या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. नुकत्याच घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिनिधीने ज्या ठिकाणी वारंवार असे अपघात हाेतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. येथे काेणते बदल करणे आवश्यक आहे, याबाबत आसपासच्या नागरिकांशी चर्चा केली. त्यानुसार येथे सुधारणा करण्यासाठी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. छत्रपती शहरात असलेल्या ब्लॅकस्पाॅटचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्या मार्गावरील वाहतुकीची संख्या, नेमके अपघाताचे ठिकाण, त्याची कारणे, सद्य: स्थितीत उपयोगात येणाऱ्या रस्त्यात आयआरसी आणि वाहतुक नियमाप्रमाणे रोड फर्निचर आहे का? या तांत्रिक बाबींचा समावेश करून त्या-त्या ठिकाणी येत्या काळात सुधारणा करणे अपेक्षित आहे.
हे आहेत महापालिका हद्दीतील ब्लॅक स्पाॅट
कॅम्ब्रिज ते नगरपाका दरम्यान कॅम्ब्रिज चौक, आठवडी बाजार, चिकलठाणागाव, धुत हाॅस्पीटल, रामनगर, श्रीरामनगर, मुकुंदवाडीचौक, एपीआय क्वार्नर, सिडको बसस्टॅन्ड चौक, खंडपीठ , सेव्हनहील, आकाशवाणी,मोंढानाका, क्रांतीचौक, अदालतरोड, महावीर चौक. बीड बायपास, नगरनाका ते दौलताबादरोड, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन-पैठणरोड कॅम्ब्रिज ते जालना, कॅम्ब्रिज ते सावंगी बायपास, सिडको बस स्टॅन्ड ते जळगावरोड, नगरनाका ते वाळूज, धुळे-सोलापूर हायवे
तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही आहेत कारणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महापालिका हद्दीतून आठ राष्ट्रीय महामार्गांचा वेढा आहे. यात काही महामार्गांचे काम अद्याप बाकी आहे. काही महामार्गांवर पुलांचे देखील कामं झालेली आहेत. महापालिका हद्दीत गत दहा वर्षात आमदार-खासदारांच्या व सरकारी अनुदानातून कोट्यावधीने रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. असे असताना अपघाताचे प्रमाण घटण्याऐवजी ते थेट ७० टक्क्यांनी वाढले आहे.
शहरातील प्रत्येक महामार्गावर अपघातांचा अभ्यास करताना प्रतिनिधीने शहरातील काही सेवानिवृत्त अधिकार्यांना प्रश्न विचारले. प्रत्यक्षात यातील काही अधिकार्यांसोबत प्रतिनिधीने अपघाताच्या रस्त्यांची पाहणी केली. अपघाताला वेग मर्यादा ओलांडणे, नशा करून गाडी चालविणे, वेळोवेळी वाहनांची सर्व्हिसिंग न करणे, वाहनांची दुरूस्ती न करणे, हेड फोन कानात घालुन वाहन चालविणे , वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे या व अशा काही मानवी चुका कारणीभूत असल्या तरी शहरात वाढणाऱ्या अपघाताला सदोष रस्ते हेही कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.आगामी काळात शहराच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग तसेच महापालिका हंद्दीत देखील पहिल्या टप्प्यात शंभर कोटीचे रस्ते होत आहेत. यापुर्वी संबंधित विभागांनी रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी फारसी काळजी रस्ते व पुलाचे बांधकाम करताना घेतलेली दिसून आली नाही. आगामी काळात संबंधितांनी काळजी घ्यावी असा सल्ला या अधिकार्यांनी संबंधित बांधकाम विभागांना दिला. त्यांनी काही उपाय योजनाही या पाहणीतून सूचविल्या आहेत.गेल्या सहा महिन्यातील अपघातांच्या आकडेवारीची आणि वर्ष २०२२ ते २०२३ च्या ८ महिन्यातील आकडेवारीची तुलना केल्यास ७० टक्क्यांनी अपघात वाढल्याचे स्पष्ट होते.
सर्वोच्च न्यायलयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अपघात झाल्यानंतर स्थानिक विश्लेषण समितीने अपघात कशामुळे झालेला आहे याची माहिती घेऊन ती माहिती जिल्हा रस्ते सुरक्षा समितीसमोर सादर करावयाची असते. या आठ महिन्यात या समितीकडून असा कोणत्याही अपघाताचा अहवाल सादर करण्यात आला नाही. विशेष म्हणजे रस्ते अपघातांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्या संयुक्त विद्यमाने अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने अपघातस्थळांची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करायची जबाबदारी देण्यात आली होती. केली. मात्र आयुक्त बदलले आणि समितीचे अस्तित्वच कुठे दिसत नाही.
काय निघाला तज्ज्ञांच्या मते निष्कर्ष
रस्त्याच्या कडेला पंखे नसणे, ॲप्रोच रोड नसणे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे, वाहनांची वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर नसणे, चुकीच्या ठिकाणी यु टर्न किंवा डिवायडरमधून रस्ता देणे तसेच अनेक मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघातांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. रस्त्यांच्या पंख्यालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत अथवा पक्क्या गटारींऐवजी नाल्या कोरून ठेवने, दुभाजक , पुल गतिरोधक रात्रीच्या अंधारात दिसून यावेत यासाठी आवश्यक उपाय योजनांची वानवा दिसून आली. वळणमार्गावर थर्मापेस्टचे कर्व्हे नसणे, सायकल, मोटार सायकल आणि जड वाहनांसाठी वेगवेगळ्या लेन करून त्यात सचित्र थर्मापेस्ट पांढरे पट्टे नसणे, बहुतांश ठिकाणी धोकादायक पुलांचे चित्र दिसले.
जालनारोडला येथे अंडरपासची गरज
गेल्या वर्षीच्या तुलनेत जालना रोडवरवर सहाच महिन्यात आठ लोकांचा बळी गेला. येथे अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवतांना यात चिकलठाणा , कॅम्ब्रिज चौक, अमरप्रीत, रामगिरी चौक, मुकुंदवाडी चौक, आकाशवानी व अदालत रोड जिल्हा न्यायालयासमोर अपघात कमी करण्यासाठी चौकात अंडरपास तयार करण्याची गरज आहे. शिवाय बीड बायपास, मुकुंदवाडी चौक ते कॅम्ब्रिज बायपास, सिडको बस स्टॅन्ड ते हर्सुल टी पाॅईंट सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास या मार्गावर होणारे अपघात कमी होऊ शकतात.
नगरनाका ते दौलताबाद रूंदीकरण आवश्यक
नगरनाका ते दौलताबाद रोडवर रस्त्यावर होणारे अपघात हे वाहन ओव्हरटेक करताना होत असल्याचे दिसून आले आहे. हा रस्ता अरूंद आहे. या रस्त्याचे रूंदीकरण झाल्यास बेलगाम वाहने शिस्तीत येतील. शिवाय वाहनधारकांना पुरेशी जागा मिळेल. परिणामी अपघातांचे प्रमाण कमी होईल. सद्यःस्थितीत विविध मार्गांवर टाकलेले ओबडधोबड अती उंचीचे स्पीड ब्रेकर देखील अपघाताला कारणीभुत ठरत आहेत. विविध मार्गावरीव फुट ओव्हर ब्रीजची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.