
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका प्रशासनाकडून वर्षानूवर्षे अक्षम्य दुर्लक्ष झालेल्या स्वच्छतागृहांबाबत आता चांगला निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल सात कोटी रुपये खर्च करून शहरात १६ स्वच्छतागृहांचे बांधकाम केले जाणार आहे. यापूर्वीची शहरात २२ स्वच्छतागृहे सुरू आता. त्यात आता पुन्हा १६ स्वच्छतागृहांची भर पडल्याने शहरातील एकूण स्वच्छतागृहांची संख्या ३६ होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढावी, यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मागणी होता. यासाठी एका खाजगी प्रकल्प संचालकाची नियुक्ती केली असून, टेंडर प्रक्रियेचे काम देखील जलदगतीने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील १७ लाख नागरिक पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने मागील अनेक वर्षांपासून प्रचंड त्रास सहन करीत आहेत. नागरिकांची नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सात कोटी रूपये खर्च करून शहरात १६ स्वच्छतागृहे उभारण्याचा चांगला निर्णय घेतला.
महापालिका निधीतून पहिल्या टप्प्यात कॅन्सर हाॅस्पीटल , पीर बाजार , कांचनवाडी, सिध्दार्थ उद्यान, कबीरनगर, डाॅ. सलीम अली गार्डन, पीया मार्केट, एन ११ भाजी मार्केट, नेहरू उद्यान, क्रांतीनगर , सिडको एन १ एसबीआय चौक व दुसऱ्या टप्प्यात शहानुरवाडी उड्डाणपूल, स्टेशन उड्डाणपूल, टाउन हाॅल उड्डाणपूल, सिडको उड्डाणपुलाखाली अशी एकूण १६ सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
सहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेविकांनी महिला शौचालयांचा अभाव असल्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. या रणरागिणींमुळे प्रशासनाने औरंगपुरा, मकबरा, राजनगर परिसरात युद्धपातळीवर महिला शौचालये उभारली. मोठा गाजावाजा करून याचे लोकार्पणही केले. दुर्दैवाची बाब म्हणजे शौचालय चालविण्यासाठी मनपाला आजपर्यंत कंत्राटदार न मिळाल्याने ती बंद आहेत.
या शिवाय महिला व पुरुष शौचालयांचे बांधकाम ही बरीच जुनी असल्याने त्यांची दुरूस्ती करणे अपेक्षित आहे. गुलमंडीवरील किमान ५० वर्षे जुने शौचालय मनपाने कारण नसताना पाडले. आसपास नवीन शौचालय बांधण्याची घोषणा प्रशासनाने केली. पण नवीन तर सोडा; साधे मोबाइल टॉयलेटही मनपाने उभे केले नाही.
मागील वर्षी मनपा प्रशासनाने शहरात तब्बल १०० ठिकाणी प्लास्टिकचे युरिनल (लघवीसाठी) उभारण्याचा निर्णय घेतला. ३२ लाख रुपये खर्च करून युरिनल खरेदी केले. ५० पुरुषांसाठी, तर ५० महिलांसाठी हे युरिनल असतील, असे जाहीर झाले. वॉर्ड कार्यालयांनी मोजक्याच ठिकाणी हे युरिनल बसविले. त्यावर फक्त ५० लिटर पाण्याची टाकी बसविली. दिवसभरातून पन्नास वेळेस टाकीत पाणी कसे येईल, याचे नियोजन नाही. त्यामुळे हे युरिनलही बंद पडले.
घरातून बाहेर पडलेल्या एखाद्या नागरिकाला शौचालय गाठायचे असेल तर त्याने कुठे जावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. अनेक मधुमेहींना तर वारंवार जावे लागते. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला, विविध दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिलांची प्रचंड गैरसोय होते. यामुळे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतलेल्या निर्णयावर नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.