छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको प्रभाग क्र. ५ व ६ च्या वार्ड कार्यालयाच्या इमारतीचे भाग्य तेरा वर्षांनंतर उजळले असून या इमारतीसाठी १५ लाख ८९ हजार ३७६ रुपये ६१ पैशांचा निधी महापालिका प्रशासकांनी मंजूर केला आहे.
सिडको वार्ड कार्यालयाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. मुख्य इमारतीला गळती, अंतर्गत रस्ते, नागरिकांची बैठक व्यवस्था, कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची दालने आदींचे नूतनीकरण करण्याची गरज होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासकांकडे कार्यकारी अभियंता (इमारत) यांनी या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी महापालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क अंतर्गत या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली.
सिडकोचे महानगरपालिकेत हस्तांतर झाल्यानंतर सिडकोच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीमध्ये महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालये क्र.५ व ६ स्थलांतरीत करण्यात आली होती.१ एप्रिल २००६ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त आसीमकुमार गुप्ता यांच्या काळात तेथे कार्यालये सुरू कण्यात आली होती.
आता अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा स्वरूपाची उभारण्यात येत आहे. यात मुख्य इमारतीच्या समोर खुल्या जागेचे सुशोभीकरण, फ्लोअरिंग, नागरीकांची आसनव्यवस्था, छताचे वाॅटरप्रुफींग, प्रसाधनगृहांची दुरूस्ती, पार्किंग, रंगकाम अशा स्वरूपाची कामे केली जात आहेत.
याकामासाठी १५ लाख ८९ हजार ३७६ रुपयाचे अंदाजपत्रक वार्ड अभियंता सुनिल जाधव यांनी तयार केले होते. सदर कामासाठी ५ एप्रिल २०२३ रोजी ई - टेंडर काढण्यात आले होते. महापालिका प्रशासकांनी २६ जुन २०२३ रोजी निधीला मंजुरी दिली होती. या टेंडरप्रक्रियेत सुमीत कंन्सट्रक्शन कंपनीने १४.१ बालाजी सिव्हिल इंडस्ट्रिज ७.५ व राॅयल इंटरप्रायजेस कंपनीने ९.८९ इतक्या कमी टक्के दराने टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. अखेर यात सुमीत कंन्सट्रक्शन कंपनीने १४.१ इतक्या सर्वात कमी टक्के दराने टेंडर भरल्याने त्यांना १७ जुलै २०२३रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. यामुळे सदर कामात अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा दोन लाख २२ हजार ६७० रूपये महापालिकेचे वाचले आहेत. अर्थात १३ लाख ६६ हजार ७०८ रुपये २८ पैसे खर्चून इमारतीच्या विविध सुधारणा करण्यात येत आहेत.