
औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग जालनारोड - हिरापूर - वरूडकाजी या रस्त्याचे अर्धवट काम सोडून कंत्राटदाराने (Contracting) यंत्रणा पसार केली होती. परिणामी रस्त्यावर मुरूम आणि खडीचे ढिगारे आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. मुरुमाच्या ढिगाऱ्यांनी वाट अडवली होती.
या अर्धवट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी स्वतः आंदोलन केले होते. मात्र तरीही कंत्राटदार बधत नव्हता. शेवटी अधिकारीच कंत्राटदाराच्या ताटाखालचे मांजर म्हणत बागडेंनी हात टेकले होते. याबाबत ‘टेंडरनामा’ने अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते. सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे.
औरंगाबाद तालुक्यातील फुलंब्री मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग-१८ जालना रोड-हिरापूर-सुलतानपूर ते वरूड फाटा या चार किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अहमदनगरच्या किरण पागोरे यांच्या मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. या चार किमी रस्त्याच्या दर्जा उन्नतीसाठी सरकारच्या २०१९-२० मध्ये ग्रामीण विकास मंत्रालय व एशियन डेव्हलपमेंट बॅंकेतर्फे दोन कोटी १२ लाख रुपये मंजूर झाले होते. रस्ता बांधकामाची जबाबदारी ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवर सोपविण्यात आली होती.
अधिक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदाराला १९ जून २०२१ रोजी वर्क ऑर्डर दिल्यानंतर बारा महिन्यात काम पूर्ण करायची अट होती. परंतू रस्त्यावर खडी, मुरूम अंथरून त्याने यंत्रणा पसार केली होती. केलेल्या कामाचेही बारा वाजले होते. या रस्त्याचे भूमीपूजन स्वतः बागडे, तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके यांच्या हस्ते झाले होते.
भूमीपूजनानंतर दीड वर्षांपासून हा रस्ता पूर्ण करण्यात आला नसल्याने प्रवाशांसह पादचाऱ्यांना चालणेही अवघड होऊन बसले होते. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार हरिभाऊ बागडे यांनी शेकडो गावकऱ्यांसह आंदोलन केले होते. मात्र, शाखा अभियंत्यापासून उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यासह अधीक्षक आणि मुख्य अभियंता हे कंत्राटदाराच्या ताटाखालचे मांजर असल्यानेच या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार बागडे यांनी केला होता. मात्र बागडेंच्या आंदोलनानंतरही अधिकारी आणि कंत्राटदार बधत नसल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही,
उपरोक्त उल्लेखीत या रस्त्याचे मजबुतीकरण करून कंत्राटदाराने यंत्रणा पसार केली होती. मात्र निकृष्ट पध्दतीने मजबुतीकरण केल्याने त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांंमुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले होते. खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत असत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी संबंधित विभागासह आमदार आणि कंत्राटदाराकडे केली होती. परंतु संबंधित विभागाकडून आणि कंत्राटदाराकडून याकडे दुर्लक्ष केले गेले.
बागडेंना दिलेल्या आश्वासनाची अधिकारी आणि कंत्राटदाराने पुर्तता केली नाही. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डरनुसार दिलेल्या वेळेत काम न केल्याने अनेकदा कंत्राटदाराला नोटीसा आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याचे म्हणत वेळकाढूपणा करत होते. तर कंत्राटदार बांधकाम साहित्य मिळत नसल्याचे म्हणत चालढकल करत होता.
याबाबत ‘टेंडरनामा’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. रस्त्याचे काम व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बांधकाम विभागाने चार किलोमीटरच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.