
औरंगाबाद (Aurangabad) : पूल आणि त्या पुलाच्या खालील रस्त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे यावरून औरंगाबाद महानगर पालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्यात संभ्रम कायम आहे.
शहानुरमियॉ दर्गा ते संग्रामनगर रेल्वेपुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. खड्डे आणि केरकचऱ्याच्या वेढ्यातून वाहनधारकांना वाट शोधावी लागत आहे. याकडे मात्र देखभाल करणाऱ्या प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. यासंदर्भात 'टेंडरनामा' प्रतिनिधीने मनपाचे शहर अभियंता ए. बी. देशमुख यांना विचारणा केली असता, पुलाखालच्या रस्त्याची जबाबदारी आमच्याकडे आहे, पुलावरील धावपट्टीची जबाबदारी एमएसआरडीसीकडे असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे पूल बांधून १२ वर्षांचा काळ लोटला असून, पुलाची पुढील देखभाल - दुरुस्तीची सर्व जबाबदारी मनपाची असल्याचे एमएसआरडीसीचे अभियंता अशोक इंगळे यांनी स्पष्ट केले. एकूणच औरंगाबादेतील हा एकच नव्हे, तर सर्वच उड्डाणपुलांच्या देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाकडे? या पुलांचा मालक कोण? असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे.
शहानुरमियाॅ दर्गा ते संग्रामनगर रेल्वे गेट क्रमांक - ५४ वर उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. शहानुरवाडी आणि बीडबायपाससह सातारा - देवळाईकडे राहणाऱ्या सव्वालाख लोकांसाठी मानबिंदू ठरलेल्या उड्डाणपुलाच्या देखभालीची जबाबदारी कुणाची , याबाबत प्रचंड संभ्रम असल्याने नेमका जाब विचारावा कुणाला, असा सवाल १७ लाख औरंगाबादकरांसमोर उपस्थित झाला आहे.
'टेंडरनामा'ने बीडबायपास मार्गावरील संग्रामनगर चौकातील सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत जागतिक बॅंक प्रकल्पातील कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, उप अभियंता सूर्यवंशी आणि शाखा अभियंता सुनिल कोळसे यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या येथील सदोष पुलाच्या डिझाईनचा पर्दाफाश केला होता. शहानुरमियाॅ दर्गा ते संग्रामनगर उड्डाणपुलाबाबत असंख्य तक्रारींचा पाढा सुरू झाला. जागृक नागरिकांचा तक्रारीचा पाऊस कोसळल्यानंतर प्रतिनिधीने बुधवारी सकाळी ९ ते दुपारी उशिरापर्यंत नागरिकांसोबत पुलाची बारकाईने पाहणी केली असता, या पुलाकडे किती दुर्लक्ष होत आहे, याची कल्पना न केलेलीच बरी.
पुलाच्या दोन्ही बाजुच्या धावपट्टीवरील चढ - उतारासह खालच्या जोडरस्त्यांच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. गतवर्षी पुलाच्या उतारावरील जोड रस्त्यांच्या वळणावर बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी गाडलेले बोलार्ड देखील उपटून नेले. सद्यस्थितीत पुलाखालील लोखंडी रॅलिंग पळवण्याचे काम युध्दपातळीवर पण मोठ्या शिताफीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या खाली प्रत्येक खोल्यात आणि रेल्वे रुळानजीक मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. रुळाच्या शेजारीच ३० मीटर अंतरापलिकडे एकाची बीअर शाॅपी असल्याने येथे दारूच्या बाटल्या आणि प्लास्टीक ग्लाससह प्लास्टीक पिशव्यांचा खच पडलेला दिसला. दिवसरात्र पुलाखालून वाहतूक करताना असुरक्षितता जाणवत असल्याची कैफियत येथील महिलांनी 'टेंडरनामा'कडे मांडली. यावेळी महिलांच्या डोळ्यात अश्रू देखील दाटले. पुलाखाली झालेली कचरापट्टी या पुलाच्या सौंदर्याला बाधा पोहोचवित आहे.
या उड्डाणपुलाची एकूणच अवस्था पाहता बांधकाम झाल्यापासून संबंधित कंत्राटदाराने या पुलाचा मेन्टेन्स केला नसल्याचे जणू काही पुरावेच येथे सापडत आहेत. पुलाशेजारी राहणारे व्यापारी, नागरिक देखील याची साक्ष देत आहेत. यामुळे या उड्डाणपुलाचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भात मनपाचे नवनियुक्त शहर अभियंता अविनाश देशमुख एसएसआरडीसीचे अभियंता अशोक इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता उड्डाणपुलाची देखरेख नेमकी कोणाच्या अखत्यारित येते, ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही.
शहानुरमियाॅ दर्गाह ते बीडबायपास या मार्गाने दररोज अनेक प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी ये - जा करतात. मात्र त्यांच्याही लक्षात ही बाब येऊ नये, याबाबत डोळ्यावर झापडी ठेऊन प्रवास करतात की काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. याबाबत आश्चर्य देखील व्यक्त केले.
शहरातील वाहनांची वाढती कोंडी सोडविण्याकरिता जालनारोड, शहानुरमिया दर्गाह ते बीडबायपास रेल्वे गेट क्रमांक - ५४ संग्रामनगर, महावीरचौक सीबीएस मार्ग, रेल्वे स्टेशन ते पैठण जंक्शन, ज्युबलीपार्क आदी ठिकाणी उड्डाणपूल आकारास आले. हे उड्डाणपूल औरंगाबादकरांसाठी सोयीचे ठरले. मात्र निर्मितीनंतर या पुलांवरून खाली कोसळून अनेक अपघात झाले. त्यात अनेकांचे प्राण गेले. पुलांच्या धावपट्टीवर कुठेही आयआरसीच्या मानकाप्रमाणे गतिरोधक नाहीत. क्रांतीचौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाआधीच एका माजी सैनिकाचा थेट वाहनासह पुलावरून कोसळुन मृत्यू झाल्याने केवळ या पुलाच्या कमी उंचीच्या कठड्यावर लोखंडी कठडे लावून उंची वाढवली. इतर पुलांवर मात्र ही सोय केली नाही. महावीर चौक, सेव्हनहील, ज्युबलीपार्क, कॅम्ब्रिज ते झाल्टा फाटा पुलांचे दुभाजक जमीनदोस्त झाल्याने अपघाताचा मोठा धोका आहे. काही पुलांच्या धावपट्टीच्या मधोमध दुभाजकच नाहीत. त्यामुळे अपघाताची मालिका कायम आहे.
नियमानुसार उड्डाणपुलावरून वाहतुकीची वेगमर्यादा ३५ ते ४० किमी़ प्रति तास असतानाही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून ९० ते १०० च्या वेगाने वाहने पिटाळताना दिसून येतात. या धोकादायक प्रकारावर अंकुश लावण्यात पोलिस प्रशासनाला यश आलेले नाही. आता तर उड्डाणपूल पूर्णतः बेवारस असल्याचे दिसून येते. मागील कित्येक दिवसांपासून या उड्डाणपुलांची देखभाल - दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले रस्ते, पाण्याचा निचरा करणारे मोडके पाईप, कठड्यांवर उगवलेले वड, पिंपळाची झाडे, अस्ताव्यस्त पडलेला कचरा, भिक्क्षुकांचे निवारागृह, प्लाॅस्टीक आणि दारूच्या बाटल्यांचा खच, दिशादर्शक फलकांची झालेली वाताहत, कलौधान नाहीसे झालेले झेब्रा क्राॅसिंग पट्टे, चारचाकी, दुचाकी आणि जड वाहनांसाठी थर्मापेस्ट व्हाईट पट्टे, रात्रीच्या अंधारात दुभाजक, कठडे यांना धडका बसू नयेत यासाठी रिफ्लेक्टर, किटकॅट ऑईज, रेडियम पट्टे कुठेही नाहीत.
काही वर्षापूर्वी नव्याने उभारलेल्या या उड्डाणपुलांवर फोटोसेशनसाठी जोडपे तसेच तरुणाईसाठी आवडते ठिकाण झालेले हे उड्डाणपूल आता सात ते आठ वर्षातच अपघाताचे ठिकाण बनले आहेत. शहानुरमियाॅ दर्गाह ते संग्रामनगरसह सगळ्याच उड्डाणपुलांची सारखीच अवस्था आहे. या पुलांप्रमाणेच सर्वच पुलांवरून धोकादायक व जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
शहरातील सर्वच पुलांच्या बांधकामासाठी शासनाने एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. शहानुरमियाॅ दर्गाह ते संग्रामनगर पुलाचे काम रेल्वे आणि एमएसआरडीसीने केले आहे. रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे काम रेल्वेमार्फत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील श्री इंजिनिअरींग कंपनीने केले होते. पुलाची धावपट्टी, जोडरस्त्यांची कामे एमएसआरडीसीच्या वतीने पुण्याच्या मनोजा स्थापत्य यांनी काम केले होते. याकामासाठी पुण्याचीच कश्येप इंजिनिअरींग कंपनीची सल्लागार म्हणुन नियुक्ती केली होती. या पुलाचे बांधकाम २०१३ मध्ये पूर्ण होऊन बांधकामासाठी २७ कोटी ६५ लाखाचा खर्च करण्यात आला होता. पुलाचे बांधकाम होऊन उद्घाटनासाठी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या औरंगाबादच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींनी फित कापण्यासाठी मोठी चढाओढ केली होती. या भानगडीत दोनदा उद्घाटन झालेल्या या पुलाच्या देखभाल - दुरुस्तीसाठी उद्घाटनाचे श्रेय लाटणारे मात्र आज आवाज उठवत नाहीत, अशी शोकांतिका नागरिकांनी व्यक्त केली.