
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या 'पे ॲन्ड पार्क' या चुकीच्या धोरणाविरोधात मोठा लढा उभारला. 'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेने व्यापाऱ्यांना पाठबळ दिले. केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मध्यस्थी केली. अखेर काही दिवस महापालिका प्रशासक डाॅ. जी. श्रीकांत यांनी कॅनाॅट परिसरातील 'पे ॲन्ड पार्क' धोरणाला स्थगिती दिली.
त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 'पे ॲन्ड पार्क' धोरणाबाबत काही निर्देशही दिले. सोबत यासंदर्भात मी व्यापाऱ्यांच्या हित ध्यानात घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे शोषण होईल असा निर्णय घेणार नाही, असे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना दिले. व्यापाऱ्यांबद्दल सकारात्मक निर्णय घेतल्याने प्रशासकांची प्रशंसा व्यापारी व ग्राहक वर्तुळात सुरू आहे.
असोसिएशनच्या लढ्याला यश आल्याने कॅनाॅट परिसरात व्यापारी व ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होताना दिसले. महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. जी. श्रीकांत यांनी आज कॅनाॅट व्यापारी वेलफेअर असोसिएशनसोबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी येथील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावा , अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील मालमत्ता विभागाने २३ जून २०२२ रोजी शहरातील बिजलीनगर भागात राहणाऱ्या कर्बलेट पार्किंग ॲन्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काही अटी व शर्ती राखून शहरातील टी. व्ही. सेंटर, निराला बाजार, उस्मानपुरा, पुंडलीकनगर, कॅनाॅट, सुतगिरणी चौक, अदालत रोड आदी सात ठिकाणी 'पार्किंग ' ची फी वसुल करण्यासंदर्भात कार्यादेश दिला.
हा कार्यादेश देताना मालमत्ता अधिकाऱ्याने दिनांक २६ मे २०२२ रोजी झालेल्या स्थायी समितीचा ठराव क्र. ४०२ चा संदर्भ जोडत २१ जून २०२२ रोजी कंपनीसोबत द्विपक्षीय सामंजस्य करार केला होता. त्यानुसार ठेकेदाराने दोन आठवड्यापूर्वी कॅनाॅट परिसरात अचानकपणे 'पार्किंग' वसुली सुरू करताच व्यापारी , ग्राहक आणि नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. चारचाकी , दुचाकी उभी करताच 'पार्किग' फी साठी कर्मचारी हातपुढे पसरवताच एकच गोंधळ उडाला होता. परिणामी येथील व्यापारी, ग्राहक आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिक आणि ' फी 'वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांत दररोज वादावादी होऊ लागली होती.
हे चुकीचे आणि मनमानी पध्दतीचे धोरण महापालिकेने रद्द करावे यासाठी येथील शेकडो व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांनी 'टेंडरनामा'कडे कैफियत मांडली होती. प्रतिनिधीने संपूर्ण एक दिवस येथील वादावादीचा स्पाॅट पंचनामा केला होता. त्यावर सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. एवढेच नव्हे, तर थेट महापालिका प्रशासक डाॅ. जी श्रीकांत व माजी खासदार चंद्रकांत खैरे, खा. इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खा. तथा केंद्रिय मंत्री डाॅ. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आ. हरिभाऊ बागडे (नाना) , आ. प्रदिप जैस्वाल, आ. संजय सिरसाट जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे तसेच सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी देखील महापालिकेच्या 'पे ॲन्ड पार्किंग' धोरणाबाबत निर्णय बदलाला अशी महापालिका प्रशासकांकडे मागणी केली होती.